कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा
मकरसंक्रांती ते रथसप्तमी या काळात हिंदू घरातून हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांमध्ये संघटन व्हावे, एकोपा वाढावा तसेच संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने आंबिवली-कल्याण येथील कोकणकर रहिवासी मंडळातील महिलांमार्फत रथसप्तमी दिनी हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून रथसप्तमी दिनी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे आंबिवली-कल्याण येथील कोकणकर रहिवासी मंडळातील महिलांकडून स्नेह व गोडवा वाढावा याकरीता तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेविका अस्मिता गोवळकर व लिलाबाई तरे या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. "सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करायला हवे, स्वत:चे रक्षण करायला हवे तसेच महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येणे काळाची गरज आहे" असे सामाजिक संदेशाचे वाण गोवळकर यांनी उपस्थित महिलांना दिले. मंडळाच्या सचिव इंद्रायणी भिके यांनी उपस्थितांचे स्वागत करुन रुचिता खाक्ये, उषा आयरे, मनिषा बंदरकर, दिपाली मोरये यांनी सर्व महिलांना मंडळामार्फत हळदी-कुंकू व वाण देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विद्याधर आयरे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समारंभ यशस्वी करण्यासाठी महिला संघटक स्वाती आडलीकर, मानसी राऊळ, मिनाक्षी मिंडे, प्रितम म्हाडगुत, ॲड. अक्षया भिके, ॲड. प्राजक्ता साळगांवकर, कल्पना महडिक, सरिता शिंदे व मंडळाचे कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment