निवडणूक आयोगाच्या सूचनेस निवडणूक नायब तहसिलदारांकडून हरताळ

निवडणूकीचे कामकाज अत्यंत संवेदनशील, महत्त्वाचे आणि कालमर्यादेत पूर्ण करावयाचे असल्याने, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास निवडणूकीचे कामकाजाकरीता शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या योग्य कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात कंत्राटी पध्दतीने शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या पात्र कॉम्प्युटर ऑपरेटर्सची नेमणूक केली जात होती.

परंतु, ठाणे जिल्ह्यातील '१३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात' निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती वर्षा नाईक थळकर, यांनी मागील एक वर्षापासून शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या अपात्र असलेल्या एका कॉम्प्युटर ऑपरेटरची नेमणूक करुन भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेस हरताळ फासल्याने मतदार यादीत मतदाराच्या नावासमोर त्याच्या फोटो ऐवजी वयासंबधीचे घोषणापत्र अपलोड केल्याचे तसेच मतदार रहात असलेल्या ठिकाणच्या यादी भागात नोंदणी न करता भलत्याच ठिकाणच्या यादी भागात नोंदणी करुन मतदारांना त्रास दिल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अपर्णा सोमाणी आरोळकर यांचे कार्यालयात संपर्क साधला असता, त्यांनी कॉम्प्युटर ऑपरेटर्सची नेमणूक संबंधित मतदारसंघातूनच केली जात असल्याचे स्पष्ट केल्याने, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी दिपक आकडे यांना विचारले असता, त्यांनी निवडणूक नायब तहसिलदार वर्षा नाईक थळकर यांना पाठीशी घालण्याच्या हेतूने, कॉम्प्युटर ऑपरेटर्सची नेमणूक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून होत असल्याचे सांगितले.

नुकतेच मतदार यादीत मतदारांचे नावासमोर संबंधित मतदाराचे छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची सूचना भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले असल्याने, मतदारसंघातील हयात मतदारांची नोंदणी तसेच मतदारांचे नावासमोर योग्य फोटो अपलोड व इतर कामकाज योग्यप्रकारे होते की नाही याची पडताळणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कल्याण- दिपक आकडे तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उप नियंत्रक तथा मतदार नोंदणी अधिकारी नरेश वंजारी करणार आहेत, की निवडणूक नायब तहसिलदार वर्षा नाईक थळकर यांनी नेमणूक केलेल्या अपात्र कॉम्प्युटर ऑपरेटरच्या जागी योग्य ऑपरेटरची नेमणूक करुन निवडणूकीच्या कामकाजात होणाऱ्या अक्षम्य चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार की महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे संबंधित नायब तहसिलदार यांच्यावर कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य त्रस्त मतदारांना पडला आहे.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा