कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्पाद्वारे पर्यटनाला मिळणार चालना

(एचपी न्यूज-: २७ ऑगस्ट) MTDC व इंडियन हॉटेल प्रा. लि.(ताज ग्रुप) यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्याकरीता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
          महाविकास आघाडी सरकारने थोड्याच कालावधीत मागील दोन दशकांपासून पर्यटनाला चालना देण्यासाठी वाट पाहत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पंचतारांकित पर्यटन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेऊन आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (ताज ग्रुप) यांच्यात लीज डीड व सबलीज डीड असे दोन करार करण्यात आले. शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुकास्थित मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी ५४•४० हेक्टर जमीन ९० वर्षांसाठी भाडेपट्टयाने देण्याकरीता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली असून इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशातील व परदेशातील पर्यटक आकर्षित होतील तसेच यामुळे रोजगार निर्मिती होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. 
याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व थ्रायव्हिंग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यातही ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. "राज्यातील विविध समुद्रकिनारे, गड-किल्ले, जंगले, ताडोबातील वाघ हे राज्याचे भांडवल असून योग्य पद्धतीने जगाच्या दृष्टीस आणले पाहिजे व पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची आवश्यकता असून त्याकरिता राज्य शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येईल. ताज ग्रुपने कोकण पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कोकणातील वैभवाची जगाला ओळख होईल" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. "पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून या प्रकल्पासाठी ज्यांनी जमिनी दिल्या आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात यावा" असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
          मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव अशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभाग प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, इंडियन हॉटेल्स प्रा. लि. (ताज ग्रुप) चे कार्यकारी उपाध्यक्ष राजेंद्र मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष बिजल देसाई, सरव्यवस्थापक सायंथिया नरोन्हा, थ्रायव्हिंग हॉटेल्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा