नोकरी इच्छुक बेरोजगारांना आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन


 एचपी न्यूज टीम (मुंबई १९ ऑगस्ट २०२०)-: महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत आधार क्रमांक ऑनलाइन लिंक करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.

शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोकरीसाठी नाव नोंदणी केलेल्या बेरोजगारांना सेवा-सुविधा ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट मार्फत देण्यात येतात. राज्यात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळवून त्यासाठी प्राधान्यक्रमाने नोंद करून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण संस्थांची माहिती प्राप्त करून सहभाग घेणे. तसेच शैक्षणिक पात्रता, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल अशाप्रकारची वैयक्तिक माहिती दुरुस्ती करणे व उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

उद्योजकांच्या मागणीनुसार याद्यांमध्ये नावाचा समावेश होण्यासाठी व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी बेरोजगार उमेदवारांच्या नोंदणीस आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नोकरी इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक लिंक करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मुंबई शहर), १७५, पहिला मजला, दादाभाई नवरोजी मार्ग, फोर्ट मुंबई ४००००१ या पत्त्यावर अथवा ई-मेल asstdiremp.mumcity@ese.maharashtra.gov.in अथवा दूरध्वनी क्र. ०२२-२२६२६३०३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्र सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा